Saturday, February 26, 2011

चार ओळी..

- तुझ्या आठवणींवर झुरण्याचा
  मला होता वेडा छंद, 
  तव अल्लद ओल्या स्मृतींना
  येई केवड्याचा गंध .
            
- भावबंध तुझ्याशी
 कधीच जुळून गेलेले,
 फूलं नव्या कळ्यांचे
 रात्रीत फुलून गेलेले.

-आठवण कधी थोडी थोडी
आठवण कधी येई फार
आठवणींच्या लाटांवरुनी
वाहून गेलीत वर्षे चार

Wednesday, February 23, 2011

पुन्हा.....

पुन्हा बॉम्बस्फोट..
पुन्हा तपास ,
पुन्हा आरोपी,
पुन्हा खटले,
पुन्हा तारीख,
पुन्हा मथळे,
पुन्हा काळाचा वळतो रोख,
पुन्हा गेलेल्यांसाठी क्षणिक शोक,
उद्या.......
पुन्हा बॉम्बस्फोट  ! 
               
                 (   संकल्प
                 मार्च २००९  )

Monday, February 21, 2011

पाऊस पडलेला..

तिन्हीसांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला,
वाऱ्याच्या गाण्याची संथ मधुर धून
अन आसमंत सारा केशराने भरलेला 

भरल्या आभाळी पावसाची
लागे हलकी हलकी चाहूल
अवखळश्या कृष्णमेघांची
मनास पडलेली भूल

झाडाझाडांतून नव्या चैतन्याचा सूर
 अन् सूर्यास्ताचे वेध क्षितिजाकडे
गंध मातीचा ओला पावलांशी
सांडूनी सुवासिक अत्तराचे सडे

अर्थ अक्षरजन्माचा
न सांगता कळलेला 
तिन्ही सांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला   

 -  गौरव पांडे
  (संकल्प
   फेब्रुवारी २०११ )

Saturday, February 19, 2011

शब्द

घन घन अमृतकण
शब्द ज्वाला शब्द सरण |धृ |

जन्म सारा शब्दांच्या चरणी वाहिलेला
श्वास जगण्याचा असे शब्द जाहलेला
शब्द झाले जगणे आणि शब्द मरण  |१|

न्यायास्तव होई शब्दांचे रणकंदन
दुखावल्या मनाला शब्द रक्तचंदन
दु:ख चराचराचे शब्द करी हरण  |२|

शब्द उजळी जसा तिमिरातला दीप
शब्द ओंजळीत शब्द क्षितिजासमीप  
शब्दचांदण्यातून जावे शब्दा शरण |3|

काही वेगळे..

आयुष्य जगण्याचे माझे ध्यास वेगळे होते
केलेले हे मन्मनाशी कयास वेगळे होते |

ओघळत्या स्वेदधारांची सर यावी कशाला ?
सोन्या-रुप्या  कष्टाचे घास वेगळे होते |

मरुस्थली मृगापरी जल धुंडीत होतो
ते जीवनाने फेकलेले फास वेगळे होते |

 बेईमानांनी सारी दुनिया भरली होती
प्रामाणिकास झालेले  त्रास वेगळे होते |

आजकाल जो तो रतीब टाकतो शब्दांचा
शब्द 'गौरव'चे काही खास वेगळे  होते |

- गौरव पांडे   
ध्यास
जून २००७ 

..पाहिलंय का?

कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या  मुखवट्याखाली 
मी कितीदा रडलोय ते? 
नोटांच्या चळतीकडे धावताना 
जाणवतोय का कुणाला
पायांखाली कुस्करलेला पारिजाताचा सडा ?
या मद्यधुंद जल्लोषात
ठेवली  आहे का कुणी
एखाद्या श्रांत क्षणी दिलेल्या 
ओंजळभर पाण्याची आठवण?
रोजच्या तासा-मिनिटांच्या गणितांत 
जपलाय का कुणी ऊराशी
एखादा  अश्रूभिजला क्षण ?
रणरणत्या ऊन्हातही 
जागवलाय का कुणी मनात 
तो पहिला वेडा पाऊस ?
विचारलंय का कुणी स्वत:ला 
डोळाभरून चंद्र पाहून 
किती दिवस लोटलेत ते ?
कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या  मुखवट्याखाली 
मी कितीदा रडलोय ते?
                     -    गौरव पांडे

सवय



आजकाल मन उदास असत फार
डोळ्यांसमोर चाललेला अनीतिचा व्यापार
रोजच्या रोज वाढत जाणारे हे कृष्णविवर...
अणि त्यातून आपले स्वत्व जपण्याची वृथा धडपड!!
आपण सारेच झालोय त्याचा भाग..
अगदी स्वत:च्याही नकळत!!
पण .. मनातल्या संवेदनाही मारत चालल्यात हळूहळू     
नव्हे ! मेल्याच आहेत त्या...
म्हणूनच , आपण रोज वाचतो , जवान शहीद झाल्याच्या ,
बॉम्बस्फोटाच्या, बालक भूकबळी गेल्याच्या बातम्या..
अगदी निर्विकारपणे...
मनातल्या मनात क्षणभर रडण्यासाठी सुद्धा
वेळ नाहीये आपल्याकडे !!
रोजची लोकल सुटता कामा नये.. बस्स..
आता जाणवतच नाहीत हातांना अनीतीचे अदृश्य ठसे..
खरच!! मरत चाललेली संवेदना..
तुमची .. माझी .. आपल्या सर्वांची !!
आणि .. आपण तर सवय करून घेतली आहे
असं मेलेलं मन घेउन जगण्याची ..
पण..का कोणास ठाऊक गेल्या कित्येक दिवसांत ...
माझ्या गुलाबाला फूलं नाही आलेलं ....
                           --
                               गौरव पांडे