Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Tuesday, June 26, 2012

खोटा पाऊस

हल्लीचा पाऊसही 
रिपरिप येतो खोटे 
धुवांधार बरसणारा 
पाऊस गेला कुठे ? 

Tuesday, June 5, 2012

पसारा


दिसतात चांदण्यात 
त्या सुंदर वेळा 
कुसुम सुगंधित
शब्द-स्पर्श-सोहळा 
अजूनही वाऱ्यावर
तुझा अबोल इशारा 
तुझ्या आठवणींचा मी
आवरू कसा पसारा ?
             -  गौरव पांडे 

Saturday, March 31, 2012

ग्रेस यांस ....



कावळे उडाले स्वामी..’ म्हणत ,
तू कवितेच्या अनवट वाटेवर केलेली शब्द्फुलाची उधळण
डोळ्यांत साठून राहिली आहे अजून...
तू दु:खाचा महाकवी असशीलही,
पण तुझ्या कवितेत आत्मशोधाचा , कारुण्याचा
रक्तगंधाचा दिवा जागत राहिलाय अजून....
चर्चबेल’च्या निनादात ‘ओल्या वेळूच्या बासरी’चे सूर शोधणारा
तू एकटाच असशील..
महाकवीची मिजास जपत,
उभ्या आयुष्याचं एकटेपण साजरं करणारा
तू एकटाच असशील..
प्रतिभेच्या पूजेसाठी लौकिकाचे अस्तर झुगारणारा
तू...
दुर्बोधतेच्या वाळवंटात कवितेची बेसरबिंदी लपवणारा
तू...
संध्याकाळच्या कातरवेळांत, उडून गेलेल्या कावळ्यांत,
रुणझुणत्या नुपूरांत, वाहून जाणाऱ्या पाण्यात,
तू शोधलेले साक्षात्काराचे क्षण
आमच्या हाती लागतच नाही आहेत अजून.....
इंग्रीड बर्गमनच्या आरस्पानी डोळ्यांत तुझे ऐहिक प्रेम जितके बुडून गेलयं,
तितकेच बुडलोय आम्ही पण तुझ्या रेशमाच्या शब्दसंभ्रमात...
आम्ही पुन्हा पुन्हा शोधात राहू अर्थान्वयाचे सेतू ,
तुझ्या कवितेच्या शब्दांत, नादलयीत आणि
खोल साद घालणाऱ्या ललित स्वगतांत...
आणि तू...
ख्रिस्ताचा क्रूस धरून, भौतिकाला उधळत,
संध्याकाळच्या कविता’ गात असशील
तुझ्याचं  ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशात’.....  

- गौरव पांडे  
gauravpande1992@gmail.com   

Friday, February 24, 2012

निरोप


उभ्या जन्माचे चैतन्य
आज या क्षणात आहे
जरी दिसत नसले तरी 
चांदणे मनात आहे..

विरहाच्या या क्षणी 
अश्रू नकोत उदास
सुखद आठवणींनी येतील
भरून अंतरश्वास.

सहवास सुटला देठाचा 
तरी फुल अजुनी गाते 
फुलाचे अन देठाचे 
आहे सुगंधाचे नाते 
              
            -  गौरव पांडे 

Wednesday, October 19, 2011

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी,  
डोळ्यांत पाणी,
सारे काही ठरलेले,
अजून उरी जपले आहे 
तुला कधी न कळलेले..

तुझ्या माझ्या भावलहरींचा 
जरा कुठे बसता मेळ,
शब्द सारे हरवून जाती 
विरहाची ये अवचित वेळ
  मध्यरात्रीच्या दीर्घ स्वगतांत
  स्मरणाचे ऋतू सरलेले 

  तुझ्या आठवणी 
  डोळ्यांत पाणी 
  सारे काही ठरलेले...

Saturday, July 16, 2011

भेट

आपलं ते अवचित भेटण
ते डोळ्यांत पाहण
जुने नवे संदर्भ शोधण
अनोळखी रस्त्यावरून चालत जाण

अनोळखी दिशा
अनोळखी वळणे 
परी तुझ्या सोबतीचा 
उघडोनी नकाशा 
दिशा झाली रोजची 
मार्ग पायांखालचा

विरहाचे दुख: सारे 
सांगून हलके झाले
वाहत्या वाऱ्यासंगे
क्षण आनंदाचे आले

उगाच आपण नंतर 
बोलत राहिलो काही
समयाचा सूर्य तिथे 
वेगे बुडून जाई

हळव्या मोहक क्षणी 
हातात गुंतले हात 
स्तब्ध सारे स्थलकाळ 
स्तब्ध चंद्र आकाशात 

जे बोललोच नाही
त्याचा अर्थ कैसा लागला  
परतीच्या वाटेवर 
प्राजक्त गंधाळला. 
               -  गौरव 

Wednesday, April 13, 2011

संभ्रम

स्वप्न सत्याच्या संघर्षात 
माझे पाऊल कुठले ?
सत्य स्वप्न,स्वप्न सत्य 
साधे गणित चुकले 

हरवून गेल्या दिशा दहा 
हरवून गेले सूर 
सत्य मिथ्या,दंश वृथा 
स्वप्न राहिले दूर 

व्यक्त-अव्यक्ताचा अर्थ निरर्थक
निरार्थाकाचाच खेळ सारा 
खिन्न मन उदास क्षण 
पश्चात उरे पसारा 

घट्ट नाती खोल वेदना 
सुखदुःखाचे अवघे विभ्रम 
विरली वाट उरले केवळ 
पाऊल...काटे...संभ्रम...

Friday, April 1, 2011

खेळ

सुखदु:खे अन हास्यअश्रू    
अव्यक्तातून शाश्वत ज्ञान,
जीवनखेळ हा अद्भुत नश्वर
नसे हारजीत नुरे अवधान
 

Friday, March 11, 2011

पाऊस

पाऊस झाला हिरवा
हिरव्यागार पानांचा
थेंबांतून उलगडे 
खेळ नव्या क्षणांचा 

पाऊस आला दाटून 
मेघांच्या अधरांतून
होई पृथ्वी चैतन्याची
ओल्या गंधित मातीतून

पाऊस झाला धुंदीचा 
शब्दातीत ओळखीचा 
वेडावल्या मनाच्या 
हव्या हव्या आठवणींचा.. 

Saturday, March 5, 2011

चार ओळी

सुखदसे पहाटस्वप्न
विरून जाई निमिषात 
मनी रुंजत राहती 
हातात गुंतले हात..

Wednesday, February 23, 2011

पुन्हा.....

पुन्हा बॉम्बस्फोट..
पुन्हा तपास ,
पुन्हा आरोपी,
पुन्हा खटले,
पुन्हा तारीख,
पुन्हा मथळे,
पुन्हा काळाचा वळतो रोख,
पुन्हा गेलेल्यांसाठी क्षणिक शोक,
उद्या.......
पुन्हा बॉम्बस्फोट  ! 
               
                 (   संकल्प
                 मार्च २००९  )

Monday, February 21, 2011

पाऊस पडलेला..

तिन्हीसांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला,
वाऱ्याच्या गाण्याची संथ मधुर धून
अन आसमंत सारा केशराने भरलेला 

भरल्या आभाळी पावसाची
लागे हलकी हलकी चाहूल
अवखळश्या कृष्णमेघांची
मनास पडलेली भूल

झाडाझाडांतून नव्या चैतन्याचा सूर
 अन् सूर्यास्ताचे वेध क्षितिजाकडे
गंध मातीचा ओला पावलांशी
सांडूनी सुवासिक अत्तराचे सडे

अर्थ अक्षरजन्माचा
न सांगता कळलेला 
तिन्ही सांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला   

 -  गौरव पांडे
  (संकल्प
   फेब्रुवारी २०११ )

Saturday, February 19, 2011

शब्द

घन घन अमृतकण
शब्द ज्वाला शब्द सरण |धृ |

जन्म सारा शब्दांच्या चरणी वाहिलेला
श्वास जगण्याचा असे शब्द जाहलेला
शब्द झाले जगणे आणि शब्द मरण  |१|

न्यायास्तव होई शब्दांचे रणकंदन
दुखावल्या मनाला शब्द रक्तचंदन
दु:ख चराचराचे शब्द करी हरण  |२|

शब्द उजळी जसा तिमिरातला दीप
शब्द ओंजळीत शब्द क्षितिजासमीप  
शब्दचांदण्यातून जावे शब्दा शरण |3|

काही वेगळे..

आयुष्य जगण्याचे माझे ध्यास वेगळे होते
केलेले हे मन्मनाशी कयास वेगळे होते |

ओघळत्या स्वेदधारांची सर यावी कशाला ?
सोन्या-रुप्या  कष्टाचे घास वेगळे होते |

मरुस्थली मृगापरी जल धुंडीत होतो
ते जीवनाने फेकलेले फास वेगळे होते |

 बेईमानांनी सारी दुनिया भरली होती
प्रामाणिकास झालेले  त्रास वेगळे होते |

आजकाल जो तो रतीब टाकतो शब्दांचा
शब्द 'गौरव'चे काही खास वेगळे  होते |

- गौरव पांडे   
ध्यास
जून २००७ 

..पाहिलंय का?

कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या  मुखवट्याखाली 
मी कितीदा रडलोय ते? 
नोटांच्या चळतीकडे धावताना 
जाणवतोय का कुणाला
पायांखाली कुस्करलेला पारिजाताचा सडा ?
या मद्यधुंद जल्लोषात
ठेवली  आहे का कुणी
एखाद्या श्रांत क्षणी दिलेल्या 
ओंजळभर पाण्याची आठवण?
रोजच्या तासा-मिनिटांच्या गणितांत 
जपलाय का कुणी ऊराशी
एखादा  अश्रूभिजला क्षण ?
रणरणत्या ऊन्हातही 
जागवलाय का कुणी मनात 
तो पहिला वेडा पाऊस ?
विचारलंय का कुणी स्वत:ला 
डोळाभरून चंद्र पाहून 
किती दिवस लोटलेत ते ?
कुणी पाहिलंय का?
या हसऱ्या चेहरयाच्या  मुखवट्याखाली 
मी कितीदा रडलोय ते?
                     -    गौरव पांडे